Friday, December 28, 2018

हार

ताठरलेल्या कण्याची ताठरली ती मान,
वाकला तो की संपले हे प्राण?
परखड वाणीची प्रांजळ जुबान,
शब्द झाले रुसवे की बहिरे झाले कान?
का असा निर्लज्ज तू, उभा शत्रूच्या उंबरठी
मिटला तो पुरुषार्थ सारा की उरली नाही मती?

नजर झुकवणे शिकलास कुठे?
गिळलास ती प्रतिष्ठा कुठे?
विचार तरी हा आलाच कसा माथी?
वाटलीस अब्रू सारी की नव्हतीच ती कधी?
मोह हा जडला तुला की उन्माद हा चढला?
अरे प्राण त्यागतो कशासाठी हेच तू भुलला?

बघ जरा त्या झापड्या उघडून,
कोणादारी भिक्षुक तू?
ऐक जरा पडदे खोलून,
स्तुतीतली निंदा
हार गळ्यात घालून की फाशीचा फंदा?
बघ राजा...अरे बघ जरा,
तुझा रंक कसा झाला...

सांग जरा .....




सांग जरा ..... 



सांग शब्द कोणते पोखरतात तुला?
सांग धून  कोणती पांघरवते तुला ?
गुंफूनि दोन्ही आता गीत हे बनवेल मी.
तार छेडीत साथ तू आज मला देशील का?


सांग काहूर कोणते हे पेटते श्वासांतूनी  ?
सांग कहर कोणता माजतो अक्षांतूनी ?
ऐकवटवून दोन्ही आता ज्योत हि तेजवेल मी . 
तूप घालून लक्ष्याचे ज्वलंत तिला ठेवशील का?


सांग स्वप्न कोणते जागे ठेवते तुला ?
सांग झोप कोणती स्वप्नात नेते तुला?
साखरझोपेच्या स्वप्नांतूनी घेऊन तुला उडेल मी. 
अंतर नापित सफर तू स्वर्गात त्या नेशील का? 


सांग जरा .... 
सांग जरा .... 
उघडुनि तुझा अंतरात्मा,
प्रवेश मला तू देशील का ?

Wednesday, September 12, 2018

ती एक ज्योती...!

   


सुखापरीस  देह । ते मंदिर निर्जीव ।
 कापला अंतरात्मा । गटांगळयांत जीव ।
 तरळते दिव्यात वात । जळेल ठाऊक तिजला ।
प्रकाशलोभी राख ती वात । नि दिवा तो विझला ।


                अंत समोर उभा दिसला तरी कर्तव्यलोभ  सुटत नाही. सुखाची ओढ शेवटच्या क्षणासही वाटते. अपूर्ण वाटते सर्व अन् आशा तरीही सुटत नाही.
                व्हीलचेअर वर बसलेल्या त्या म्हातारीला हेच सर्व वाटत होते. पण तिचा मोह आता तिला मानवत नव्हता. तिचा तो हरवलेला कुत्रा एक दिवस  नक्की स्वतःहून परतेल याची खात्री होती तिला. रोज सकाळी हवा मानवत नसतानाही बाहेर अंगणात येऊन बसणे आता तिचा दिनक्रम बनला. तिची अवस्था पाहून ती पुढच्याच क्षणाला प्राण सोडेल असे वाटत होते. 
                कुत्र्यात जीव अडकला होता तिझा. तिचे ते वाट पाहणे कुत्रा समोर येताच संपेल अन् तिची ती प्राणज्योत तिथेच मावळेल या काळजीने तिची मुलगी तो कुत्रा येऊच नये असे चिंतीत होती. पण तिच्या आईचा तो विव्हळता देह आणि निर्जीव स्तिथी पाहून तिलाही आता आस लागली होती.
               एक दिवस तो येईल आणि मगच मी सुखाचा श्वास टाकेल अश्या हट्टालाच पेटली होती ती. ती त्या कुत्र्यावर आपल्या पोटच्या पोरासारखे जीवाची राखरांगोळी करून प्रेम करायची. अचानकच तो एके दिवशी निघून गेला कि कुणी त्याला नेला या संभ्रमात होती ती. त्याच्याबरोबर काही वाईट झाले तर नाही ना? या विचारानेच तिचा थरकाप उडे. त्याला फक्त सुरक्षित पाहून प्रेमाने कुरवाळायची तिची इच्छा होती. 
               एके शांत पहाटी दारात भुंकण्याचा आवाजाने मुलगी बाहेर आली. आणि त्या आवाजात तिचा आक्रोशसुध्दा संमिलित झाला. 
                 ती ज्योती आता विझून गेली होती आणि प्रेमप्रकाशाचा दिवाही तिच्यासोबत विझला होता.