सुखापरीस देह । ते मंदिर निर्जीव ।
कापला अंतरात्मा । गटांगळयांत जीव ।
तरळते दिव्यात वात । जळेल ठाऊक तिजला ।
प्रकाशलोभी राख ती वात । नि दिवा तो विझला ।
अंत समोर उभा दिसला तरी कर्तव्यलोभ सुटत नाही. सुखाची ओढ शेवटच्या क्षणासही वाटते. अपूर्ण वाटते सर्व अन् आशा तरीही सुटत नाही.
व्हीलचेअर वर बसलेल्या त्या म्हातारीला हेच सर्व वाटत होते. पण तिचा मोह आता तिला मानवत नव्हता. तिचा तो हरवलेला कुत्रा एक दिवस नक्की स्वतःहून परतेल याची खात्री होती तिला. रोज सकाळी हवा मानवत नसतानाही बाहेर अंगणात येऊन बसणे आता तिचा दिनक्रम बनला. तिची अवस्था पाहून ती पुढच्याच क्षणाला प्राण सोडेल असे वाटत होते.
कुत्र्यात जीव अडकला होता तिझा. तिचे ते वाट पाहणे कुत्रा समोर येताच संपेल अन् तिची ती प्राणज्योत तिथेच मावळेल या काळजीने तिची मुलगी तो कुत्रा येऊच नये असे चिंतीत होती. पण तिच्या आईचा तो विव्हळता देह आणि निर्जीव स्तिथी पाहून तिलाही आता आस लागली होती.
एक दिवस तो येईल आणि मगच मी सुखाचा श्वास टाकेल अश्या हट्टालाच पेटली होती ती. ती त्या कुत्र्यावर आपल्या पोटच्या पोरासारखे जीवाची राखरांगोळी करून प्रेम करायची. अचानकच तो एके दिवशी निघून गेला कि कुणी त्याला नेला या संभ्रमात होती ती. त्याच्याबरोबर काही वाईट झाले तर नाही ना? या विचारानेच तिचा थरकाप उडे. त्याला फक्त सुरक्षित पाहून प्रेमाने कुरवाळायची तिची इच्छा होती.
एके शांत पहाटी दारात भुंकण्याचा आवाजाने मुलगी बाहेर आली. आणि त्या आवाजात तिचा आक्रोशसुध्दा संमिलित झाला.
ती ज्योती आता विझून गेली होती आणि प्रेमप्रकाशाचा दिवाही तिच्यासोबत विझला होता.
ती ज्योती आता विझून गेली होती आणि प्रेमप्रकाशाचा दिवाही तिच्यासोबत विझला होता.

No comments:
Post a Comment